मुंबई प्रतिनिधी । आजवर कोविडच्या उपचारानंतर म्युकर मायकॉसीस होत असल्याचे मानले जात असतांना आता कोरोनाचा संसर्ग झाला नसतांनाही याच्या संसर्गाचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञाने दिल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
कोरोनाचा प्रकोप सुरू असतांना ब्लॅक फंगस अर्थात म्युकर मायकॉसीसचे संकट समोर उभे ठाकले आहे. अनेक राज्यांनी याला महामारी म्हणून घोषीत केले आहे. यातच आता या बुरशीच्या संसर्गाबाबत नवनवीन दावे केले जात आहेत. ब्लॅक फंगस फक्त कोरोनाच्या रूग्णांनाच होतो, असे नाही तर ब्लॅक फंगस कोरोना नसलेल्या व्यक्तीला देखील होऊ शकतो. याचा सर्वाधिक धोका हा ब्लड शुगर असलेल्या व्यक्तीला आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी म्हटले आहे की, ब्लॅक फंगस कोविडच्या आधीही होतो. मधुमेहाच्या रुग्णांना देखील ब्लॅक फंगस होऊ शकतो. ज्यांचा मधुमेह कंट्रोलमध्ये नाही अशा व्यक्तींना या संसर्गाचा धोका अधिक आहे. म्हणून यादरम्यान मधुमेह असलेल्या रूग्णांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
डॉ. पॉल म्हणाले की, ज्यांच्या साखरेची पातळी 700 ते 800 पर्यंत पोहोचते, ज्याला मधुमेह केटोएसिडोसिस देखील म्हटले जाते. त्यांना ब्लॅक फंगसचा धोका असू शकतो. लहान मुलापासून वृद्धांपर्यंत कोणालाही ब्लॅक फंगस होऊ शकतो. त्याच बरोबर, एम्सचे डॉ. निखिल टंडन म्हणाले आहेत की, निरोगी लोकांना या संसर्गाची चिंता करण्याची गरज नाही. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांना फक्त जास्त ब्लॅक फंगसचा धोका आहे.