छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यव्यापी दौर्‍यास प्रारंभ

कोल्हापूर वृत्तसंस्था । मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.

संभाजी छत्रपती यांनी आज कोल्हापूर येथे शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून या दौऱ्यामागची भूमिका विशद केली. माझा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. मराठवाडा आणि खान्देशात जाऊन तिथे समाजाची भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर 27 मे रोजी मुंबईत जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

 

समाजाने 58 मोर्चे काढलेले आहेत. त्यातून सरकारपर्यंत भावना पोहोचवण्यात आल्या आहेत. आता कितीवेळ लोकांना रस्त्यावर आणायचं? कोरोनाचं वातावरण आहे. त्यामुळे आंदोलन आणि उद्रेक हा शब्द काढणंही योग्य नाही, असं सांगतानाच सर्व पक्षीय नेत्यांनी या प्रश्नावर काय मार्ग काढता येईल ते पाहावं, असं आवाहनही त्यांनी केलं. मी या आंदोलनाचं नेतृत्व करत नाही. तर समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

Protected Content