जामनेर, प्रतिनिधी | भारतीय नागरिकत्व संशोधन विधेयक भारत सरकारने पारित केल्यानंतर या विधेयकाला काही संघटना व राजकीय पक्षांकडून राजकारण करीत विरोध होत असल्याने विधेयकाला समर्थन देण्यासाठी विविध संघटनांचे विधेयकाला समर्थन करण्यासाठी जामनेर शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने आज बाबाजी राघो मंगल कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत विधेयकाला समर्थनार्थ घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.
मोर्चेकऱ्यांतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. या निवेदनात पाकिस्तान अफगाणिस्तान, बांगलादेश येथील धार्मिक अत्याचार निर्वासित हिंदू ,बौद्ध, जैन ,शीख, पारसी ,इसाई बांधवांना नागरिकत्व देण्यासंदर्भात भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक असे नागरिकता संशोधन विधेयक बहुमताने पारित केलेले आहे. राष्ट्रपती यांची विधेयकावर स्वाक्षरी होऊन रूपांतर नागरिकता संशोधन कायद्यात झालेले आहे. नागरिकता संशोधन कायद्याचे आम्ही जामनेर तालुक्यातील सर्व नागरिक सर्व समाज आणि व्यापारी संघटना स्वागत व समाधान व्यक्त करतो. सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कायद्याचे स्वागत केले जात असताना काही लोक या कायद्याच्या विरोधात जाऊन देशात अराजकता माजविण्याचे काम काही संघटना करत आहेत. चुकीची माहिती पसरवून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात येत आहे. हिंसाचार घडवून आणणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर योग्य ती चौकशी करून गुन्हा नोंद करावेत व कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी तहसील कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा मंचचे राहुल चव्हाण यांनी कायद्याच्या समर्थनार्थ बाजू मांडली. यावेळी भा.ज.पा. तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, न. पा. गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शंकर मराठे, किशोर झांबरे, गोपाळ बुळे, श्रीराम महाजन, अँड. शिवाजी सोनार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.