विद्यापीठ आणि पुण्यातील अध्यापक प्रशिक्षण संस्था यांच्यात सामंजस्य करार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्था पुणे आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांच्या उपस्थितीत पुणे येथे सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील प्राध्यापकांना अत्याधुनिक प्रयोगशाळा उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सन २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्थेची पुणे येथे स्थापना केली आहे. उच्च शिक्षणातील नव्या बदलांच्या अनुषंगाने विद्यापीठ आणि विद्यापीठांशी संलग्नित वरिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना विविध विषयांवर व्यावसायिक विकासाचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रयोगशाळांमधील विविध अत्याधुनिक साधनांबाबत सैध्दांतिक ज्ञान आणि व्यावहारिक प्रात्यक्षिक प्रदान करता यावे यासाठी या प्रशिक्षण संस्थेने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे.

या विद्यापीठातील अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि पायाभूत सुविधा पाहून प्रशिक्षण संस्थेने हा निर्णय घेतला आहे. ४० शिक्षक अथवा संशोधक विद्यार्थी यांची एक तुकडी १० दिवस या विद्यापीठात येऊन निवासी प्रशिक्षण घेतील. तज्ज्ञांव्दारे या प्रशिक्षणात अत्याधुनिक संशोधन उपकरणांची माहिती आणि ती कशी हाताळावी याबाबतची माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणाकरिता आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी २२ लाख रुपये अध्यापक प्रशिक्षण संस्थेने विद्यापीठाला दिले आहेत. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार पुणे येथे नुकताच झाला असून विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ.विनोद पाटील आणि राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ.चंद्रकांत रावल यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रशिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, केंद्र समन्वयक सुरजकुमार बाबर, सुजाता वरदराजन, सविता शिंगारे उपस्थित होते.

 

Protected Content