मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न करता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नावनोंदणी सरकारी दस्तऐवजांमध्ये करणे बंधनकारक करण्याचा निर्णय झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ११ मार्च रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे आता नावनोंदणीत आईचे नाव वडिलांच्या नावाच्या आधी असेल.

१ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपातच करणे बंधनकारक करण्यात आले असून अशीच नोंद सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्येही करावी लागणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा अशा सुचना देण्यात आल्या आहे. विवाहित स्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांचे विवाहानंतरचे नाव, नंतर पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवली जाणार आहे.