जळगाव प्रतिनिधी । घरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून छातीत लाथ मारल्याने चार वर्षाचा चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार जळगावात आज दुपारी घडला आहे. मुलगा मयत झाल्याचे पाहून संशयित आरोपी फरार झाला असून याबाबत एमआयडीसी पोलीसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पहूर ता. जामनेर येथील 30 वर्षीय विवाहिता ही रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरात भाड्याने राहते. विवाहितेस तीन मुली आणि चार वर्षाचा मुलगा महेश यांच्या सोबत राहते. तसेच मिळेल ती मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करून आपली उपजिवीका भागविते. कैलास अशोक माळी (वय-34) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याची संबंधित विवाहितेशी ओळख असल्याने कायम घरी येणे-जाणे सुरू असायचे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास कैलास माळी हा रामेश्वर कॉलनीतील विवाहितेच्या घरी आला. विवाहितेचा मुलगा महेशच्या हाताला पेनाची शाई लागली असल्याने कैलासने शाईचा हात का भरलास ? अशी विचारणा केली. या कारणावरून विवाहिता आणि कैलास माळी यांच्या शाब्दीक वाद झाला. या वादात संतापाच्या भरात कैलासने चार वर्षाच्या चिमुकल्या महेशच्या छातीत लाथ मारली. लाथ मारताच महेश जमीनीवर पडताच त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. लागलीच शेजारी राहणाऱ्या महिलांनी त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी खासगी वाहनाने आणले. मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी त्याला मृत घोषीत केले. महेशचा मृत्यू झाल्याची वार्ता आईला कळताच तिने हंबरडा फोडला. दरम्यान, संशयित आरोपी कैलास माळी हा घटनास्थळाहून फरार झाला होता. जिल्हा रूग्णालयात एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोहेकॉ अतूल वंजारी हे दाखल झाले. याबाबत एमआयडीसी पोलीसात घटनेबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते.