गडचिरोली | नक्षलविरोधी पोलीस पथकाने चकमकीत तब्बल एक कोटी २० लाख रूपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेला जहाल नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडेला ठार केल्याची अधिकृत माहिती आज पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. यामुळे नक्षलविरोधी मोहिमेले मोठे यश लाभल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. तर यात तीन पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काल ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कुख्यात माओवादी मिलींद तेलतुंबडे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी याला दुजोरा मिळाला नव्हता. आज मात्र गडचिरोली पोलिसांनी या वृत्ताला स्पष्टपणे दुजोरा दिला आहे. मिलिंद तेलतुंबडे माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य होता. महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओदिशा इत्यादी ६ राज्यात तो सक्रिय नक्षलवादी होता. त्याच्यावर तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस होते. महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम पाहणार्या मिलिंद तेलतुंबडेवर उत्तर गडचिरोली, गोंदिया आणि बालाघाट या विभागाची जबाबदारी होती.
मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने तो ओळखला जात होता. तर त्याची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता उर्फ कविता ही असून तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.