कोल्हापूर (वृत्तसंस्था) पुलवामा येथील लष्करी वाहनांवर झालेला दहशतीवादी हल्ला आणि त्यामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या त्यागाचा केंद्रातील मोदी सरकार राजकीय स्वार्थासाठी लाभ उठवित असून ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याची टिका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुंबई येथून कोल्हापुरातील कार्यकर्त्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना केली.
आजवर केंद्र सरकारने राफेल व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली आणि आता तर राफेल व्यवहाराची कागदपत्रेच चोरीला गेल्याची माहिती सांगितली जाते, ही घटना अत्यंत गंभीर तसेच या संपूर्ण व्यवहारावरच संशय निर्माण करणारी असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बुथ अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी पवार यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, के.पी. पाटील, आर.के. पोवार हे उपस्थित होते.
जवानांच्या वाहनांवर जेंव्हा हल्ला झाला, तेंव्हा देशभरातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी लष्काराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा तसेच राजकारण आणायचे नाही, असा निर्धार केला. मात्र सत्तेतील लोकच त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलविली. पण प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री भाजपचे पक्ष प्रमुख अशी मंडळीच उपस्थित नव्हती.
प्रधानमंत्री तर हल्ल्यानंतरही कामांची उद्घाटने करत, पक्षाचा प्रचार करत फिरत होते. तरीही आम्ही त्यावर टिका केली नाही. निवडणुका येतील आणि जातील. अशा कठीण प्रसंगात लष्काराच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे, दुर्दैवाने जवानांच्या त्यागाचा राजकीय लाभ उठवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असे पवार म्हणाले. अशा प्रवृत्तीना दूर करण्याची भूमिका आपण सर्वानी घेतली पाहिजे. सरकारच्या कामाचा पंचनामा करुन तो जनतेसमोर मांडावा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.