मुंबई प्रतिनिधी । नाट्यगृहांमध्ये होणा-या मोबाईलच्या वापरामुळे नाटक क्षेत्रामध्ये टीकांचा ओघ सुरु आहे तर अनेक ज्येष्ठ कलावंतांनी नाटक चालू असतांना मोबाईलच्या वापरामुळे सादरीकरणामध्ये येणारा व्यत्ययामुळे अनेकांनी उघडपणे नाराजी दर्शविली. यामुळे अखेर मुंबई महानगरपालिकेला तोडगा शोधावा लागला असून नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय घ्यावाच लागला आहे.
नाटक सुरू असताना प्रेक्षकांपैकी कुणाचा तरी मोबाइल वाजणं आणि त्यामुळं सर्वांचाच रसभंग होणे हे प्रकार सातत्याने होत होते. नाटकापूर्वी उद्घोषणा करून, कलाकारांनी विनंती करूनही फारसा फरक पडताना दिसत नव्हता. अनेक नाट्यनिर्मात्यांनी प्रयोगाच्या वेळी नाट्यगृहात मोबाइल जॅमर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रेक्षकांनी त्यास विरोध दर्शवला. मोबाईलच्या सततच्या अडथळ्याने नाटकवाले वैतागले होते. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही व्यथा मांडली होती.