
हवेली (वृत्तसंस्था) मोबाइल गेमच्या व्यसनातून एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाकर उर्फ संतोष धनपाल माळी (वय १९ रा. पेरणेफाटा, ता. हवेली) या तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली असून, त्यावर मजकूर आणि कोड लिहिलेला आढळून आला. त्याच्या मोबाइलची तपासणी करण्यात येत आहे. तो मोबाइलवर नेमका कोणता गेम खेळायचा? कोणत्या गेमच्या नादात त्याने स्वतःचे जीवन संपवले याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, संतोष हा वाघोलीमधील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याला मोबाइलवर गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. पालकांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले. मात्र, मोबाइल गेमच्या आहारी गेल्याने तो कुणाचेच ऐकत नव्हता. काही दिवसांपासून तो महाविद्यालयातही गेला नव्हता.