जळगाव, प्रतिनिधी | फोन करण्याचा बहाणा करून रिक्षाचालकाकडून मोबाईल घेऊन भामट्याने पळविल्याची घटना १७ जून २०१९ रोजी शहरात घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी जफर शेख राजू (२८) रा. जामनेर याला रविवारी ताब्यात घेतले आहे.
गजानन भरत चव्हाण (वय २५) रा.रामेश्वर कॉलनी हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी जफर हा दुपारी ११.१५ वाजता बेंडाळे महाविद्यालयाच्या समोरुन गजानन यांच्या रिक्षेत बसला. त्याने गोलाणी मार्केटजवळ एका मेडीकल दुकानासमोर रिक्षा उभी करण्यास सांगीतले. यानंतर घरी बोलायचे आहे असे सांगुन गजानन यांचा मोबाईल मागीतला. जफर हा मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करीत असतांना गजानन हे शेजारी एका हॉटेलात पाणी पिण्यासाठी गेले. याचवेळी जफर रिक्षाचालक गजानन यांचा मोबाईल घेऊन पसार झाला. यावेळी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु, तो मिळुन आला नव्हता. याप्रकरणी त्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. आज शहर पोलिसांनी जफरला अटक केली.