जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून मोबाईल व रोकड असा एकुण १२ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात दोन महिलांनी चोरून नेल्याचे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता दिपक पाटील (वय-३०) रा. भडगाव रोड, पाचोरा जि.जळगाव ह्या शुक्रवार १६ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नातेवाईकांसह जळगावातील फुले मार्केटमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या होता. फुले मार्केटमधील चंदूलाल रसवंती जवळ असतांना गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या पर्समधील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि २ हजार ४०० रूपये रोख असा एकुण १२ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढे गेल्यानंतर पर्समधून मोबाईल व पैसे चोरी झाल्याचे सविता पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी समोरील शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात महिलांविरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.