नशिराबाद लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील बसस्थानकापासून ते तरसोतद फाट्याजवळील गटार ही कचऱ्याने तुडूंब भरली आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मनसेच्या वतीने गुरूवार ३ मार्च रोजी सकाळी गटारीच्या प्रवाहात भोपळा टाकून नशिराबाद नगरपंचायत प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे.
याबाबत माहिती अशी की, नशिराबाद शहरातील बसस्थानकाजवळील संत सावता महाराज प्रवेशद्वारापासून उत्तरेस, बरकत अली यांच्या कार्यालयाजवळ तसेच तरसोद फाट्याजवळील गटार ही कचऱ्याने तुडुंब भरली आहे. सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. नागरीकांना गटारीच्या या घाण पाण्यातून वापरावे लागत आहे. हे सांडपाणी कधी अंगावर उडते, तर कधी हातातल्या वस्तूंवर उडते. रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. लोक अक्षरशः वैतागले आहेत. डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना यातून निमंत्रण मिळून अनारोग्य निर्माण होऊ शकते. प्रशासन मात्र बेफिकीर आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे व याकडे मागील ४-५ महिन्यांपासुन प्रशासन हेतुपुस्सर दुर्लक्ष करीत असल्याने, त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गटारीच्या प्रवाहात कोरडा भोपळा सोडून निषेध करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, शहर अध्यक्ष जितेंद्र बच्चाटे, शहर सचिव गोकुळ धनगर, सचिन भालेराव, लक्ष्मण तायडे, तेजस कोळी, संजय कोळी, गजेंद्र माळी, दुर्गेश वाघुळदे, मनसे कार्यकर्ते गणेश कोळी, शुभम सोनार, प्रशांत कोलते, चेतन चौधरी, मनोज पाटील सुभाष सुतार, दिलीप सुतार, सुनील रंधे, सुनील पवार, संजय जंजाळ यांनी या आंदोलनात सहभाग नोदिवला.