आमदाराकडून बँक व्यवस्थापकाचे पाय धुवून पूजा !

बीड, वृत्तसंस्था । पीक कर्ज तात्काळ मंजूर व्हावं म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी चक्क बँक मॅनेजरचे पाय धुतले आणि फुलेही उधळली. त्याच्या पायाही पडले. धस यांच्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनामुळे आता तरी बँकेकडून पीक कर्जांना मंजुरी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सुरेश धस यांनी पीक कर्जाबाबतचं भयाण वास्तव मांडलं आहे. पीकं बाजारात जाण्याची वेळ आली तरी पीक कर्ज अद्याप मिळालेलं नाही. बँकांच्या मनमानी कारभारामुळे आणि सरकारच्या अनास्थेमुळे बळीराजा हवालदिल आहे. आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण गावात देखील पीककर्ज वाटपाचा पुरता फज्जा उडालेला आहे. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकांना वारंवार भेटून विनंती करून देखील पीककर्ज वाटप यंत्रणेत काहीच बदल होत नव्हता. बँकेच्या शाखेमध्ये बारा गावातील शेतकऱ्यांची सतराशे पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी खेटे मारून दमले पण मंजुरी मिळत नव्हती. शेवटी काल गांधीगिरीचा मार्ग अवलंबत बँक शाखा व्यवस्थापकांचे पाय धुवून, फुले वाहून आहेर करत शेतकऱ्यांची पीक कर्ज मंजूर करण्याची विनंती केली, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

धस यांनी लॉकडाऊनमुळे शेतकरी खायला मोताद झाला आहे. त्यांचं पीक कर्ज मंजूर करा. या शेतकऱ्यांना हवालदिल करून आत्महत्येस प्रवृत्त करू नका, अशी विनंती बँक मॅनेजरला केली. बँकेत शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे ९ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील फक्त ५० फायली मंजूर झाल्या आहेत. बँकेकडून अत्यंत संथगतीने कारभार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप असून या शेतकऱ्यांनी धस यांच्याकडे गाऱ्हाणी केली होती. त्यामुळे धस यांनी ही बँकेत खेटा मारूनही कर्ज मंजुरी होत नव्हती. अखेर त्यांनी हा गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. सध्या बीडमध्ये धस यांच्या या गांधीगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Protected Content