भाजपमध्ये महिलांना डावलले जाते : मंदा म्हात्रे यांचा घरचा आहेर !

मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षात महिलांना सन्मान होत नसून त्यांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप करून आमदार मंदा म्हात्रे यांनी घरचा आहेर दिला आहे. महिला व बालविकास मंत्र्यांच्या समोरच त्यांनी आपल्या पक्षावर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांच्या गौरवपर कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार मंदा म्हात्रे , प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री तेजश्री प्रधान , अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यासपीठावर यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीतच भाजपावर हल्लाबोल केला.

मंदा म्हात्रे म्हणाल्या की, दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जाते. २०१९ च्या निवडणुकीत आपण अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते,. त्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या कामावर निवडून आल्याचा दावा देखील मंदा म्हात्रे यांनी केला आहे. म्हात्रे यावेळी म्हणाल्या, महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसर्‍यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार होतात.

मंदा म्हात्रे यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या कि, मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, अशी खंतसुद्धा मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. मात्र, आपण कधीही स्वतःला कमी समजू नये, असा सल्ला देखील यावेळी मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!