जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात ते किरपोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे आज आपल्या वाहनाने चोपडा तालुक्यातील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असतांना करंज गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारला एमएच १९- झेड ६२४५ क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. यात कारचे नुकसान झाले असून सोनवणे दाम्पत्यासह कारच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
सुदैवाने या अपघातात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी तेथे धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करण्याचे काम सुरू केले होते.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा अलीकडच्या काळात ऐरणीवर आला आहे. यातून अनेकदा लहान-मोठे अपघात देखील झाले आहेत. आज झालेला अपघात हा देखील वाळू वाहतूक करणार्या डंपरचालकाच्या बेपर्वाईने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यामुळे वाळू तस्करांना आळा नेमका केव्हा बसणार ? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.