
अमळनेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी करण्यात आलेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये अनिल पाटील यांचे नाव ठळकपणे समोर आले असून, त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी ग्रामीण विकास, शेती, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. मंत्रीपदाच्या काळात आपत्तीग्रस्तांना दिलासा, पुनर्वसन आणि प्रशासनातील कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. त्यांच्या प्रामाणिक आणि विकासाभिमुख कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना ही राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीनंतर अमळनेर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने अभिनंदनाचा वर्षाव केला असून, सामाजिक माध्यमांवर शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी ही नियुक्ती “अमळनेरचा आणि उत्तर महाराष्ट्राचा सन्मान” असल्याचे नमूद केले आहे.
आपल्या निवेदनात आमदार अनिल पाटील म्हणाले, “आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मला महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली, याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मी कटिबद्ध आहे.”
अनिल पाटील यांच्या या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उत्तर महाराष्ट्रात नवी ऊर्जा आणि दिशा मिळणार असून, पक्ष संघटनाच्या बळकटीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.



