मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरण विभागामार्फत जिल्ह्यात विविध निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून काही ठेकेदारांनी बनावट अनुभव प्रमाणपत्रे आणि दस्तावेज सादर करून अपात्र असूनही पात्र होण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी संबंधित ठेकेदारांची सखोल चौकशी करून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी अधीक्षक अभियंता, जळगाव यांच्याकडे केली आहे.
महावितरणच्या NSC, LT, HT Breakdown, DTC अशा विविध निविदांमध्ये काही ठेकेदारांनी कार्यकारी अभियंत्यांसोबत आर्थिक हितसंबंध साधून बनावट कागदपत्रांच्या आधारावर पात्र होण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वर्षी भुसावळ विभागात अशाच प्रकारे एडिटिंग करून बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या एका ठेकेदाराला पात्र ठरवले गेले होते, जो इतर विभागांत अपात्र ठरला होता.
विशेष बाब म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रभर निविदांसाठी समान अटी असतानाही काही विभागांत ठेकेदार पात्र ठरतात तर काही ठिकाणी अपात्र होतात. यावरून आर्थिक संगनमताचा संशय बळावतो. वारंवार पुरावे सादर करूनही महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्य तपास अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भुसावळ विभागात मागील वर्षी प्रमाणे यंदाही निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर होऊ नये यासाठी महावितरणच्या विविध विभागांतील कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी व अपात्र ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर त्वरित योग्य ती कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा डॉ. विवेक सोनवणे यांनी दिला आहे.