भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील वरणगाव येथे सेंट्रल बँकेच्या शाखेतील सुरक्षा रक्षकाकडून बॅँकेत ड्यूटी बजावत असताना अनावधानाने बंदुकीचे ट्रीगर दाबला गेल्याने गोळी सुटून त्यात तीन महिलांसह एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.२०) दुपारी घडली. जखमींना तातडीने खाजगी तसेच ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरणगाव सेन्ट्रल बँकेतील सेंट्रल बॅँकेचा सुरक्षा गार्ड लखीचंद चौधरी, हे नेहमीप्रमाणे बॅँकेजवळ ड्यूटी बजावत होते. यावेळी बॅँकेत ग्राहकांची बरीच गर्दी होती, बरेच ग्राहक बाहेरील खुर्च्यांवर बसले होते. दरम्यान सुरक्षा रक्षकाने भिंतीला लटकवलेली बंदुक काढली असता अनावधानाने बंदुकीचा ट्रीगर दाबला जाऊन बंदुकीतून गोळी सुटली. यामुळे बॅँकेच्या रांगेत बसलेले प्रमिला वंसत लोहार, शोभा प्रकाश माळी, राधेशाम छबिलदास जैसवाल व कलाबाई चौधरी यांच्या पायाला गोळी लागली आणि ते जखमी झाले. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस सुरक्षारक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.