अमळनेर-गजानन पाटील ( Special Exclusive Report ) | आकस्मीक राजकीय उलथापालथीत मंत्रीपदी विराजमान झालेले अनिल भाईदास पाटील यांची आजवरची वाटचाल ही अनेक आयामांमधून झाली असून यात ते ऑल राऊंडर असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
ना. अनिल भाईदास पाटील यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमि ही सर्वसाधारण अशी असली तरी त्यांना एक चांगला शैक्षणिक वारसा होता. त्यांचे वडील उच्चशिक्षीत असून सार्वजनीक बांधकाम खात्यामध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. नोकरीनिमित्त त्यांना ठिकठिकाणी जावे लागले. यात अनिलदादांच्या माध्यमीक शिक्षणाचा महत्वाचा भाग हा भुसावळातील के. नारखेडे विद्यालयातील होता. येथून त्यांनी स्थापत्य अभियांत्रीकी म्हणजेच सिव्हील इंजिनिअरींगमधील पदवी संपादन केली. आधीपासूनच राजकारणात रस असल्याने ते भारतीय जनता पक्षात कार्यकर्ते बनले. तर, इंजिनिअर झाल्यानंतर नोकरी न करता त्यांनी कंत्राटदार म्हणून कारकिर्द सुरू करून यात मोठे यश संपादन केले.
अमळनेरात डॉ. बी. एस. पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठ तीन वेळेस आमदार असलेला मातब्बर नेता आणि सोबतीला वाघ दाम्पत्यासारखी दिग्गज मंडळी असतांना देखील अनिल पाटील यांनी आपल्या कामाची छाप पाडल्याने ते एकनाथराव खडसे यांच्या नजरेत भरले. यामुळे त्यांना अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी मिळाली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एकीकडे सहकारात एंट्री करतांनाच त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय क्षेत्रात एंट्री केली. हे सर्व होत असतांनाच नाथाभाऊंच्याच सोबतीने त्यांनी जिल्हा बँकेत देखील प्रवेश केला.
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने डॉ. बी.एस. पाटील यांचे तिकिट कापून अनिल पाटील यांना संधी दिली. तथापि, या तिरंगी लढतीत कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी बाजी मारली. यामुळे नाऊमेद न होतांना अनिलदादांनी नागरी भागात प्रवेश करण्यासाठी आपल्या पत्नीला नगरपालिकेच्या रणांगणात उतरवले. यातून त्या नगराध्यक्षा देखील झाल्या. २०१४ साली पुन्हा भाजपकडून तिकिट मिळाले असले तरी तेव्हाही तिरंगी लढत होऊन शिरीष हिरालाल चौधरी यांनी विजय संपादन केला.
त्यांचा लागोपाठ दोनदा पराभव झाला. यातच अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपला पाठींबा दिला होता. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे तेव्हा एकास-एक अशी लढत झाल्याने ते आमदार बनले. विधानसभेत प्रवेश करताच त्यांनी अजितदादा पवार यांचा विश्वास संपादन केला. अगदी पहाटेच्या शपथविधीप्रसंगी देखील ते त्यांच्याच सोबत होते. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात त्यांनी मतदारसंघामध्ये भरीव निधी आणला. आणि आता तर ते राज्याचे मंत्री बनले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोबत झाल्या तर दहा महिने अन्यथा सव्वा वर्षे मंत्रीपद अनिल भाईदास पाटील यांना मिळणार आहे. यात मतदारसंघातील कामांना गती देतांनाच जिल्हा आणि राज्य पातळीवर छाप पाडण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. यात ते कितपत यशस्वी होणार ? याचे उत्तर हे येणारा काळच देणार आहे. मात्र, आजवरच्या कारकिर्दीद प्रचंड धाडसाने व दृृढ निश्चयाने आगेकूच करणार्या अनिल भाईदास पाटील यांना पहिल्याच आमदारकीत मंत्रीपदाच्या माध्यमातून मोठी संधी मिळाली आहे हे कुणाला नाकारता येणार नाही.