उद्या गिरणी कामगार आणि वारसांचा आझाद मैदानावर मोर्चा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दीड लाख गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप करून आता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. उद्या, मंगळवारी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचा आझाद मैदानावर मोर्चा धडकणार आहे. दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणती पाऊले उचलली जात आहेत? या कामगारांना केव्हा घरे मिळणार? याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी प्राधान्याने कामगारांना मुंबईतच घरे द्यावी अशीही आग्रही मागणी कामागरांची राहणार आहे.

पावणे दोन लाख गिरणी कामगारांचे घरांसाठी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील २५ हजार कामगारांनाच राज्य सरकार घरे देऊ शकत आहे. उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांसाठी घरेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे या दीड लाख कामगारांच्या घरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्व कामगारांना घरे देऊ, त्यांना पंतप्रधान आवास योजनेसह इतर योजनेतील घरे देऊ यासह अनेक आश्वासन दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात घरे देण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले राज्य सरकारकडून उचलली जात नाहीत. दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस धोरण आखत त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी गिरणी कामगार संघटनांकडून केली जात आहे. मात्र याकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याचे म्हणत आता गिरणी कामगार संघर्ष समितीने राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी मंगळवारी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे. घरांसाठी सुरुवातीपासून गिरणी कामगारांना संघर्ष करावा लागत आहे. या पुढेही संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मंगळवारी कामगारांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता आझाद मैदान येथे हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

Protected Content