वरणगाव पोलीसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल
वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे घराच्या जागेवर बांधकाम करण्याच्या वादातून मायलेकाला बांधकामाचे फावडा मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. जखमींवर उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी वरणगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूणाबाई गणेश इंगळे (वय-५३) रा. सुसरी ता.भुसावळ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अरूणाबाई इंगळे यांच्या घराच्या जागेवर बांधकाम करण्यावरून शेजारी राहणारे विनोद काशीराम इंगळे याच्यासह इतरांसोबत वाद झाला. या वादातून अरूणाबाई इंगळे यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज गणेश इंगळे याला बांधकामाचा फावडा तोंडावर मारून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. या दुखापतीत दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी अरूणाबाई इंगळे यांनी वरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे विनोद काशीराम इंगळे, उत्तम काशीराम इंगळे, संघर्ष उत्तम इंगळे, संदेश उत्तम इंगळे, आशाबाई विनोद इंगळे, मायाबाई उत्तम इंगळे आणि अंजली उत्तम इंगळे सर्व रा. सुसरी ता भुसावळ यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील हे करीत आहे.