गोवा वृत्तसंस्था । गोव्यात भारतीय नौदलाचे मिग-29के लढाऊ विमान आज दुपारी कोसळले आहे. प्रशिक्षणाच्या मोहिमेसाठी उड्डान घेतल्याच्या अवघ्या काही सेकंदातच ही दुर्घटना घडली. यामध्ये एक अनुभवी आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. या दोघांनीही ऐनवेळी विमानातून इजेक्ट केल्याने ते सुखरूप बचावले आहेत.
दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्यातील ‘आयएनएस हंसा’ हवाई तळावरून विमानानं उड्डाण केलं होतं. उड्डाणानंतर काही वेळातच एक पक्षानं विमानाला धडक दिली. त्यानंतर विमानाच्या इंजिनानं पेट घेतला. अपघातग्रस्त विमानात दोन पायलट होते. इंजिनाला आग लागल्याचं कळताच दोन्ही पायलट पॅराशूटच्या मदतीनं तात्काळ खाली उतरले. स्थानिकांनी त्यांना मदत केली. लेफ्टनंट कमांडर दीपक यादव आणि कॅप्टन एम. शेवखंड अशी त्यांची नावे आहेत.