घरफोडीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन संशयित एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा परिसरातील फुकटपुरा येथे घरफोडी झाल्याचा प्रकार मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी उघडकीला आला. सरफराज खान पठाण यांच्या घरातील 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्यातील एक अल्पवयीन संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात असून मुद्देमाल हस्तगत केला आहे.  त्याचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील फुकटपुरा येथे सरफराज खान अयुब खान हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते व त्यांचा मुलगा दोन्ही खाजगी वाहन चालक म्हणून काम करतात. सोमवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री सरफराज खान यांचा मुलगा बाहेरगावी गेलेला होता. रात्री १० च्या सुमारास खान कुटुंबीय खालील घराला कुलूप लावून वरील माळ्यावर झोपण्यास गेले. मध्यरात्री चोरट्यांनी खान यांच्या वरील खोलीला आणि शेजारी राहणार्‍या इतर घराला बाहेरून कड्या लावल्या. तसेच खान यांच्या घराचा कडी कोंडा तोडत घरातील कपाटामधून १५ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीचे कडे, चांदीची पोत, चांदीची अंगठी, १२ हजार रोख असा दीड लाखांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सरफराज खान हे उठले असता दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजार्‍यांची संपर्क साधला. शेजार्‍यांचा देखील दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी परिसरातील इतर काही नागरिकांना संपर्क करून बोलावले. खान कुटुंबीय खाली आल्यानंतर त्यांच्या खालच्या घरात कडी कोयंडा तुटलेले तर घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. चोरीची खात्री झाल्यावर सरफराज खान यांनी एमआयडीसी पोलीसांना माहिती दिली.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी  मेहरुण तलावाच्या जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांचे गुन्हे शोध पथक रवाना झाले. आरोपींचा शोध घेत असतांना एक अल्पवयीन पथकाच्या हाती लागला. त्याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून 61 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे. पोलिसांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलाचा साथीदार सोनु सलीम शेख रा. फुकटपुरा हा पोलिसांचा सुगावा लागताच पसार झाला आहे.  ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर यापुर्वी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक व जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

पोलीस निरीक्षक शिकारे यांनी तयार केलेल्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सुधीर साळवे, पोलिस नाईक इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, पो.कॉ. गोविंदा पाटील व सचिन पाटील यांच्या पथकाने या तपासात सहभाग घेतला. पुढील तपास मुदस्सर काझी करत आहेत.

Protected Content