जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गव्हाच्या एका सूक्ष्म दाण्यावर अप्रतिम मायक्रो पेंटिंग साकारत जागतिक स्तरावर आपली छाप पाडणारे कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांचा जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या अनोख्या कलाकृतीने कला, संस्कृती आणि राज्याभिमानाचा संगम घडवत उपस्थितांना भारावून टाकले.
मानव सेवा विद्यालय, जळगाव येथील कलाशिक्षक, चित्रकार तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, ओ.एम.जी. नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड लंडनचे मानकरी सुनिल दाभाडे यांनी गव्हाच्या दाण्यासारख्या सूक्ष्म माध्यमावर महाराष्ट्र दिनाची कलाकृती साकारून आपल्या अद्वितीय कौशल्याचे दर्शन घडवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी सुनिल दाभाडे यांच्या जिद्दीचे, बारकाईचे आणि महाराष्ट्रावरील प्रेमाचे विशेष कौतुक केले. अत्यंत सूक्ष्म माध्यमावर अशी प्रभावी कलाकृती साकारणे हे त्यांच्या प्रतिभेचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या सोहळ्यास शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, छोटू भाऊ खडके, अजितभाऊ चौधरी, गणेश लोंडगे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन दाभाडे यांचा सत्कार करत त्यांच्या जागतिक विक्रमांची दखल घेतली.
सुनिल दाभाडे यांच्या या कार्यामुळे केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. त्यांच्या कलेतील नावीन्य, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व यामुळे उपस्थितांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सतत नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या कलावंताचा हा सत्कार सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी तसेच इतर पदाधिकारी व सदस्यांनीही सुनिल दाभाडे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.



