मियाँदादने तोडले अकलेचे तारे : भारताला अणुबॉम्बची धमकी

Javed

इस्लामाबाद, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय नेत्यांसह त्या देशाच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनीही भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. काश्मीर आणि कलम ३७०च्या मुद्द्यावर बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादचीही जीभ घसरली. आमच्याकडील अणुबॉम्ब दाखवण्यासाठी नव्हे तर वापरण्यासाठी आहेत आणि वेळ आलीच तर अणुबॉम्बने सर्व नष्ट करू शकतो, असे अकलेचे तारे मियाँदादने तोडले आहेत.

 

काश्मीर आणि कलम ३७०च्या मुद्द्यावरून पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांनीही भारताला युद्धाची धमकी दिली होती. राजकीय नेत्यांसह क्रिकेटपटूही भारताविरोधात बोलू लागले आहेत. शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर, विद्यमान कर्णधार सरफराज अहमद आदी क्रिकेटपटूंनीही काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली आहे. त्यात आता जावेद मियाँदादची भर पडली आहे. काश्मीर मुद्द्यावरून भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब हा केवळ दाखवण्यासाठी नव्हे तर त्याचा वापरही केला जाऊ शकतो, अशी धमकीच त्याने दिली.
पाकिस्तानातील क्रीडा वेबसाइट खेलशेल डॉट कॉमने इंस्टाग्राम अकाऊंटवर मियाँदादचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात काश्मीर मुद्द्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्याकडे अणुबॉम्ब आहे तर त्याचा वापर स्वरक्षणासाठी करावाच लागेल. स्वसंरक्षणासाठी तुम्ही हल्ला करू शकता असा जगाचा नियम आहे, अशी प्रतिक्रिया देताना ते व्हिडिओत दिसत आहेत. पंतप्रधान मोदींवरही त्याने टीकास्त्र सोडले. मोदीसारखे लोक डरपोक आहेत, असेही तो म्हणाले.

Protected Content