सुरक्षा रक्षकाकडून लॉक काढताना बंदुकीतून सुटली गोळी ; तीन जण जखमी

crime 151889 730x419

वरणगाव (प्रतिनिधी) येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून बंदुकीचे लॉक काढताना गोळी सुटल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी घडलेल्या या घटनेनंतर गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, एका जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

 

या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास वरणगावच्या सेंट्रल बँकेतील सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी (तापी नगर, भुसावळ) यांच्याकडे असलेली डबल बोअरची बंदुक अचानक लॉक झाली. त्यामुळे ते लॉक काढण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात अचानक लॉक काढताना ट्रीगरवर बोट ठेवल्याने अचानक गोळी सुटली. शेजारी उभ्या असलेल्या प्रमिला वसंत लोहार (तळवेल), शोभा प्रकाश माळी (वरणगाव) व कलाबाई चौधरी (वरणगाव) व राधेश्याम छबीलदास जैस्वाल (वरणगाव) यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेत. या घटनेनंतर जखमींच्या नातेवाईकांनी धाव घेत संताप व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अज्ञात स्थळी हलवले.

 

दरम्यान, वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार सुनील वाणी, राहुल येवले, शेळके, कुलकर्णी आदींनीही धाव घेत जमावाला शांत केले. तसेच जखमींना हलवण्याकामी सहकार्य केले. गोळीबारानंतर बँकेतील व्यवहार ठप्प झाले असून पोलिसांकडून पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

Protected Content