Home Cities धरणगाव सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव थील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय आणि बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेत नुकताच एक भव्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शालांत परीक्षेत (इयत्ता १० वी) ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ९० गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय, NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी पाचोरा येथील ज्येष्ठ वक्ते डॉ. राजेंद्र चिंचोले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, सचिव ललितजी उपासनी, उपाध्यक्ष चिंतामण पाटील, संस्थेचे मार्गदर्शक रमेश महाजन, संचालिका सौ. शोभाताई चौधरी, ज्ञानेश्वर भामरे, मुख्याध्यापक एस. एस. पाटील आणि मुख्याध्यापक जीवन पाटील यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली, ज्यामुळे एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

डॉ. चिंचोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भविष्यात प्रचंड स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांनी योग्य मार्ग निवडून त्यात कठोर परिश्रम करून यश मिळवायचे आहे.” कोणतेही क्षेत्र असो, त्यात जिद्द आणि चिकाटी राखल्यास यश निश्चित मिळते, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपस्थित मान्यवरांमध्ये प्रा. एच. ए. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधून वेद लोहार, प्रेम सुतार आणि वेदांत माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळा आणि गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळेची प्रगती, वाटचाल आणि भविष्यातील गुणवत्तेसाठीचे नियोजन प्रभावीपणे सादर केले. अध्यक्षीय भाषणात ललित उपासनी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. डी. पाटील आणि सागर पाटील यांनी अतिशय खुबीने केले, तर एन. बी. ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound