अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणगौरव समारंभ

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बौध्द  समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच आपापल्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रेरणादायी कार्य करणारे कर्मचारी व समाजसेवक यांचा गुणगौरव कार्यक्रम बौद्ध समाज मंच, अमळनेर तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.पा.कर्मचारी पतपेढीच्या सभागृहात घेण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र संदानशिव, प्रा.डॉ.विजयकुमार तुंटे, प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.माधव भुसनार, प्रा.जयेश साळवे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्‍हाडे हे होते.

प्रास्ताविकात  प्रा.डॉ.विजयकुमार तुंटे यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले तसेच प्रत्येक समाजाचे विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव कार्यक्रम होतात. तशीच आपल्या समाजाची मुहूर्तमेढ आपण रोवत असल्याचे सांगितले.  याप्रसंगी प्रा.डॉ.राहुल निकम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप या कार्यक्रमाद्वारे पडणार आहे त्याचे महत्त्व त्यांनी महामानवांच्या जीवनातील प्रसंगांचे उदाहरणे देऊन विशद केले.

अशोक बिर्‍हाडे साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासू व व्यासंगीपणाचा प्रत्येकाने जीवनात अवलंब करावा असे आवाहन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर १८ तास अभ्यास करत होते. आपण किमान ११ तास अभ्यास करावा म्हणजे आपण यशाचे शिखर गाठू शकू. तसेच आपल्या महामानवांनी दिलेला विचारांचा वारसा आपण पुढे चालवणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

सुत्रसंचलन सोमचंद संदानशिव यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक एस.पी.वाघ यांनी केले. कार्यक्रमात आपल्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांसह मनिष उबाळे आणि किरण मोहिते यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चिंधू वानखेडे, मिलींद निकम, संजय बत्तीसे आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक समाधान मैराळे, दिलीप शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

Protected Content