नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे दुर्घटनेवेळी त्या गाडीमध्येच होत्या. सुदैवाने त्यांना कसलीही दुखापत झालेली नाही. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मेहबुबा मुफ्ती या जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्याकडे जात होत्या. यावेळी एका नागरिकाच्या गाडीशी त्यांची कार धडकली. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांना अपघातात कसलीही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मुफ्ती यांचा सुरक्षारक्षक कारमध्येच होता. त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरमधून अनंतनाग येथे आग दुर्घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी अनंतनागच्या संगम बिजबेहडाच्या जवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोंमधून दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मुफ्ती दुसऱ्या गाडीने आपल्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाल्या.