यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या जीवनमान उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या अनुषंगाने धरती आवा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना तसेच आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विधानसभा सदस्य चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित आदी उपस्थित होते.

धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची अंमलबजावणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियानास मंजुरी दिली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यातील १५ तालुके व ११२ गावे समाविष्ट असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने हा उपक्रम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून टिएसपी (TSP) आणि ओटीएसपी (OTSP) क्षेत्रातील आदिवासी समाजाच्या गावे, ज्या ठिकाणी ५०० पेक्षा अधिक किंवा ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, अशा ठिकाणी प्राथमिक गरजा, आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
आदिवासी गावांचा विकास आराखडा
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून चोपडा, रावेर आणि यावल तालुक्यातील ४१ गावांचे सामाजिक-आर्थिक परिणामांचे विश्लेषण (Social Impact Analysis) करण्यात आले आहे. या अभ्यासाअंती विकास आराखडा तयार करण्यात आला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल. उर्वरित ७१ गावांचे सर्वेक्षण सुरू आहे, असे प्रा. अजय पाटील यांनी सांगितले.
वनहक्क व्यवस्थापन आणि आराखडा
ज्या गावांना सामूहिक वनहक्क मंजूर झाले आहेत, अशा २०५ गावांपैकी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रारंभीच्या टप्प्यात २० गावांचे CFR (Community Forest Rights) व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले आहेत. सहाय्यक वनसंरक्षक हडपे यांनी या संदर्भात विस्तृत सादरीकरण केले. तसेच, वनहक्क धारकांच्या जीवनमान सुधारण्याच्या यशोगाथा सुद्धा सादर करण्यात आल्या. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी न्युक्लिअस बजेट योजना आणि विशेष केंद्रीय सहाय्य योजना २०२३-२४ अंतर्गत चालू असलेल्या योजनांची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली. तसेच, २०२४-२५ मध्ये प्रस्तावित योजनांचे स्पष्टीकरण देण्यात आले. यात शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि कौशल्यविकासाच्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.
बैठकीत मान्यवरांचे मार्गदर्शन
धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार चंद्रकांत सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. याशिवाय, आदिवासी गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सरकारी विभागांनी समन्वय साधून काम करावे, असा आग्रह या बैठकीत धरण्यात आला. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अकलादे, सहाय्यक वनसंरक्षक हडपे, प्रा. अजय पाटील (क.ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, प्रा. प्रशांत सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.