जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले. सूर्य उपासनेचे महत्त्व आणि नियमित सूर्यनमस्कार साधनेचे लाभ या उद्देशाने मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि विशेष व्याख्यान घेण्यात आले.

या कार्यक्रमात योगसाधक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सूर्यनमस्कार साधना केली. शरीर, मन आणि आत्मा यांना ऊर्जित करण्यासाठी सूर्यनमस्कार हा एक प्रभावी मार्ग आहे, असे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. कार्यक्रमात संस्कृत विभाग प्रमुख प्रा. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी “सूर्य उपासना: अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी वेदांमध्ये वर्णन केलेली सूर्य उपासना, आरोग्याच्या दृष्टीने तिचे फायदे तसेच आधुनिक युगात सौरऊर्जा प्रकल्प आणि त्यांचे उपयोग याबाबत सखोल माहिती दिली.
सोहम विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी आपल्या मनोगतातून सूर्य उपासनेचे महत्त्व आणि सूर्यनमस्काराच्या नियमित साधनेचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा व्यास यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ज्योती वाघ, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. अनंत महाजन आणि विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन आणि शांतिपाठ करून करण्यात आला. या कार्यक्रमाला योगशिक्षक पदविका, बी.ए. आणि एम.ए. योगिक सायन्सचे विद्यार्थी तसेच योगसाधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.