मुंबई (वृत्तसंस्था) निवडणुकीपूर्वी मीडियाने दाखविलेले सर्व एक्झिट पोल खोटे ठरले आहेत. त्यामुळे मीडियाला सर्व्हे करून देणाऱ्या या एजन्सींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला एक्झिट पोलचा सर्व्हे करून देणाऱ्या एजन्सींवर टीका केली. यावेळी त्यांनी जनमताचा कौल मान्य असल्याचे सांगतानाच विरोधी पक्ष म्हणून आम्ही जबाबदारीने काम करू, असे त्यांनी सांगितले. मतदानाच्या आदल्या दिवशी एक्झिट पोल दाखवण्यात आले. हे सर्व एक्झिट पोल चुकीचे होते हे सिद्ध झाले आहे. मतमोजणीच्या आदल्या दिवशी काही उमेदवार पराभूत होणार म्हणून मीडियाने जाहीर केले. ज्या उमेदवारांनी ५० हजारांपासून ते लाखापर्यंतचे मताधिक्य घेतले तेही पराभूत होणार असल्याचे या एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आले होते. त्यामुळे चुकीचा एक्झिट पोल दाखविणाऱ्या मीडिया एजन्सींनी माफी मागावी, असे थोरात यांनी म्हटले आहे.