अनुकंपाधारकांची महापौर, आमदारांनी घेतली भेट !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मनपा इमारतीसमोर उपोषणाला बसलेल्या अनुकंपाधारकांशी भेट घेत महापौर सौ.भारती सोनवणे व आमदार सुरेश भोळे यांनी चर्चा केली. सध्या असलेल्या स्थितीबाबत आणि मनपकडे आजवर केलेल्या पाठपुराव्याची त्यांनी उपोषणकर्त्यांना माहिती दिली. तसेच मनपा आयुक्तांशी चर्चा करून लागलीच बैठक घेत प्रशासनस्तरावर असलेल्या कार्यवाहीची माहिती अनुकंपाधारकांना देत लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पार पडेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला आमदार सुरेश भोळे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, आस्थापना विभागाचे श्री.डोईफोडे यांच्यासह इतर नगरसेवक, मनपा अधिकारी, उपोषणकर्ते अनुकंपाधारक उपस्थित होते. 

जळगाव शहर मनपातील अनुकंपाधारकांना ७ वर्ष होऊनही सेवेत घेतले जात नसल्याने सोमवारपासून त्यांनी मनपाच्या इमारतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. दुपारी महापौर सौ.भारती सोनवणे व आमदार सुरेश भोळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आजवर केलेल्या सर्व पाठपुरावाबद्दल माहिती दिल्यानंतर महापौरांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली. महापौरांच्या दालनात उपोषणकर्त्यांसोबत बैठक घेत मनपा प्रशासनाची बाजू त्यांच्यासमोर मांडण्यात आली. मनपा प्रशासनाने शासनाकडे सर्व पाठपुरावा केला असून गेल्याच आठवड्यात याबाबत मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक देखील झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. मंत्री महोदयांनी सर्व प्रक्रिया मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी दिली.

 

Protected Content