रेणूका नगरातील आगग्रस्त महिलेला महापौर-उपमहापौर यांच्यातर्फे संसारोपयोगी वस्तूंची मदत (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील रेणुका नगरात रेखा पिंटू भालेराव (वय-४० रा.जळके ता.जि.जळगाव) या मोलमजूरी करणाऱ्या महिलेच्या घराला मंगळवारी ४ मे रोजी सकाळी पार्टेशनच्या घराला आग लागली होती. या आगीत महिलेचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आणि नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यातर्फे आज गुरूवारी संसारोपयोगी वस्तू देवून मदतीचा हात दिला आहे. 

सविस्तर असे की,  रेणुकामाता नगरात असलेल्या भीकन निंबा चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशनच्या घरात भाड्याने राहणाऱ्या  रेखा पिंटू भालेराव (वय-४० रा.जळके ता.जि.जळगाव) यांच्या ४ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अकस्मात आग लागली. यात शेड जळून खाक झाले. या शेडमध्ये रेखा पिंटू भालेराव ही महिला आपल्या दोन मुलांसह अलीकडेच राहण्यासाठी आले होते.  तिच्या घरातील वस्तूंची अक्षरश: राख झाली आहे.

या महिलेचे पती वारले असून ती एकटीच आपल्या दोन्ही मुलांसह या पार्टीशनयुक्त घरामध्ये वास्तव्यास होती. ही महिला बांधकाम कामगार असून भल्या पहाटे गाडेगाव येथे काम करण्यासाठी गेली होती. ती महिला गाडेगावला पोहचत नाही तोच तिच्या शेजारच्यांनी फोन करून तिला तिच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर ही महिला तातडीने घरी आली. आपले घर जळून खाक झाल्याची दिसताच त्या महिलेला भोवळ आली. परिसरातील नागरिकांनी तिला धीर दिला. दरम्यान, काही तासानंतर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आणि नगरसेवक प्रशांत नाईक यांनी घटनास्थळी भेट घेवून महिलेला धिर दिला.  याप्रसंगी संबंधित महिलेकडून केला जाणारा आक्रोश उपस्थित सर्वांचेच मन हेलावून टाकणारा होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावत आज गुरूवार ६ मे रोजी सकाळी ११ वाजता रेणुकानगरात जाऊन श्रीमती भालेराव यांची भेट घेऊन महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी त्यांच्याकडे संसारोपयोगी वस्तू सुपूर्द करीत माणुसकीचा हात पुढे केला. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह इतरांनी केलेल्या मदतीमुळे श्रीमती भालेराव यांच्या चेहऱ्यावर हस्य फुलल्याचे दिसून आले आहे. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कूलभूषण पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, शिवसेना महिला आघाडीच्या मनिषा पाटील, शोभाताई चौधरी आदी उपस्थित होते.

Protected Content