मुंबई, वृत्तसंस्था | अभिनेत्री मौसमी चटर्जी हिची मुलगी पायल डिकी सिन्हाचे गेल्या १३ डिसेंबरला निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ती जुवेनाइल डायबिटीसने ग्रस्त होती. मधुमेह बळावल्याने एप्रिल २०१७ मध्ये पायलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिकच खालावल्यामुळे वर्षभरातच ती कोमात गेली. त्यानंतर तिचा पती डिकी सिन्हा हा तिला घरी घेऊन आला होता. त्यावरून चटर्जी व सिन्हा कुटुंबात तीव्र मतभेद झाले होते. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. डिकी सिन्हा पायलची काळजी घेत नसल्याचा आरोप करत चटर्जी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आता पायलचा नवरा डिकी सिन्हाने एका मुलाखतीत त्याची बाजू मांडत अनेक धक्कादायक खुलासे केले. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत डिकीने त्याचे आणि सासरच्यांचे पटत नसल्याचे सांगितले. यासोबतच तो म्हणाला की, ‘माझी त्यांच्याविरोधात काहीच तक्रार नाही. मी केस जिंकली होती आणि पायल तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत होती. मौसमी चटर्जीनी तर पायलच्या मृत्यूनंतर तिचा चेहराही पाहिला नाही. ती अंत्यसंस्कारालाही नव्हती आणि स्मशानभूमीपर्यंतही आली नाही. पायलचे वडील आणि बहीण अंत्यसंस्काराला आले होते.’
‘एवढंच नाही तर पायल जीवंत असताना तिच्या बहिणीने मेघाने एकदा तिला जबरदस्ती प्रसाद भरवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे तिचा श्वास अडकला होता. त्यांनी पायलचे आजारपण हा एक प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. ज्या पद्धतीने मी पायलचा सांभाळ करत होतो, ते बघून काही सेलिब्रिटींनी माझे कौतुक केले होते. यानंतर मौसमीने माझ्याशी भांडण सुरू केले.’
‘मी आतापर्यंत या सर्व विषयावर शांत होतो. मला माझी प्रतिमा चांगली करायची आहे, म्हणून मी यावर बोलतोय असं नाही तर लोकांना खरं काय ते कळलं पाहीजे म्हणून पहिल्यांदा मी हे बोलतोय. पायल जवळपास अडीच वर्ष कोमात होती. पण या काळात ती दोनदा शुद्धीवर आली होती. सपोर्टने ती चालतही होती. पण नंतर तिची प्रकृती खालावत गेली. या आजारपणात तिचे दोनदा ऑपरेशन झाले. एकदा तर ब्रेन सर्जरीही झाली होती.
डिकी म्हणाला की, ‘गेल्या दोन महिन्यात मौसमी पाचवेळी फक्त पाच मिनिटांसाठी रुग्णालयात आली होती. माझ्याकडे पुरावेही आहेत. मी कधीच त्यांना पायलला भेटण्यापासून अडवले नाही. माझे मोठे नुकसान झाले आहे. मला जेवढे शक्य होते तेवढे प्रयत्न मी केले. खरं सांगायचे तर मी कोणाला उत्तर द्यायला आता बांधिल नाही.’