जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | तुमच्या-आमच्या सर्वांच्या आवडीच्या व्हाटसअॅप मॅसेंजरवर आज नवीन अपडेट जाहीर करण्यात आले असून यात ग्रुपच्या सदस्यांची मर्यादा वाढविण्यासाठी काही महत्वाचे फिचर्स देण्यात आले आहेत.
आज व्हाटसअॅपने नव्याने जाहीर केलेले फिचर्सदेखील अतिशय महत्वपूर्ण असेच आहेत. यातील लक्षणीय बाब म्हणजे आता व्हाटसअॅप ग्रुपमधील सदस्यांची संख्या ही २५६ वरून ५१२ इतकी करण्यात आलेली आहे. अर्थात, आता व्हाटसअॅपचा ग्रुप हा आकारमानाचे दुप्पट होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रुपमधील सदस्य संख्या वाढणार असल्याची चर्चा सुरू असतांना आता व्हाटसअॅपने याबाबत घोषणा केली आहे.
दरम्यान, यासोबत व्हाटसअॅपने आधी जाहीर केल्यानुसार आता आपल्या सर्व युजर्ससाठी ‘रिअॅक्शन्स’ हे फिचर दिले आहे. यामुळे आता फेसबुक ग्रुपमधील वा वैयक्तीक चॅटवरील पोस्टवर ‘रिअॅक्शन’ देता येणार आहे. खुद्द मार्क झुकरबर्गने याबाबत घोषणा केली आहे. यातील पहिल्या टप्प्यात सहा भावमुद्रांचा समावेश असून यात लवकरच भर पडणार असल्याचेही त्याने नमूद केले आहे. या माध्यमातून व्हाटसअॅप पोस्टवरील एंगेजमेंट मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आधीच जाहीर केल्यानुसार आता व्हाटसअॅपवरून दोन जीबी इतक्या आकारमानाची फाईल पाठविता येणार आहे. अर्थात, टेलीग्राम या मॅसेंजरप्रमाणेच आता व्हाटसअॅप वरून देखील मोठ्या व्हिडीओ फाईल्सची सहज देवाण-घेवाण होणार आहे. या सर्व अपडेटमुळे व्हाटसअॅपवरील एंगेजमेंट ही अधिक प्रमाणात वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.