नवी दिल्ली, वृत्तसंस्था | दहशतवाद रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘बेकायदा कारवाया प्रतिबंध’ (यूएपीए) कायद्यांतर्गत भारताने चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर याचा या यादीत पहिला नंबर आहे. तसेच दहशतवादी संघटना ‘जमात उद-दावा’चा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा दुसरा नंबर आहे. तिसऱ्या नंबरवर गँगस्टर माफिया डॉन दाऊद इब्राहीम आहे. हे तिघेही पाकिस्तानात राहत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
या तीन नावांसोबतच दहशतवादी जकी-उर लख्वीचाही या यादीत समावेश आहे. यूएपीए म्हणजेच बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा नुकताच संसदेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, मसूद अजहर आणि हाफिज सईद या दोघांना संयुक्त राष्ट्राने ग्लोबल दहशतवादी म्हणून याआधीच जाहीर केलेले आहे. जर एखादी व्यक्ती दहशतवादी कारवाया करीत असेल किंवा त्यात सहभागी असल्यास त्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करता येऊ शकते, असे यूएपीए कायद्याने करता येवू शकणार आहे.
२००४ मध्ये यूपीए सरकार असताना हे विधेयक आणले होते. २००८ साली या विधेयकात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर २०१३ साली या विधेयकात पुन्हा सुधारणा करण्यात आली. जर एखादी व्यक्ती दहशतवाद पसरवण्यासाठी मदत करीत असेल, पैसे पुरवत असेल, दहशतवादी साहित्याचा प्रचार-प्रसार करीत असेल तर त्या व्यक्तीला या कायद्यानुसार दहशतवादी म्हणून घोषित करता येवू शकते.