Home Cities अमळनेर कळमसरेत उद्या मरीआईचा यात्रोत्सव 

कळमसरेत उद्या मरीआईचा यात्रोत्सव 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मरीआईचा यात्रोत्सव उद्या मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ग्रामीण संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या यात्रोत्सवासाठी कळमसरेसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कळमसरे येथे गेल्या सात वर्षांपासून मरीआईची यात्रा नियमितपणे भरवली जात असून गावात ग्रामदैवत भवानी आई व मरीआई अशा दोन यात्रा मोठ्या श्रद्धेने साजऱ्या केल्या जातात. मरीआईची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मंगळवारी आयोजित केली जाते. या दिवशी सकाळपासूनच धार्मिक वातावरण निर्माण होते आणि संपूर्ण गावातून बँड पथक व वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येते.

या मिरवणुकीत महिला, पुरुष, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. विशेष आकर्षण ठरणारा प्रसंग म्हणजे मरीआईचे निस्सीम भक्त हेमंत करडे यांचा सहभाग. ते आपल्या घरापासून थेट मंदिरापर्यंत नृत्य करीत मिरवणुकीत सहभागी होतात आणि मंदिरावर ध्वज पताका अर्पण करतात. या विलोभनीय दृश्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या भक्ताने यात्रेच्या सुरुवातीस लावलेले छोटे रोपटे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले असून, ते श्रद्धा आणि सातत्याचे प्रतीक मानले जाते.

यावर्षीही यात्रोत्सवात लोकमनोरंजनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावकरी व परिसरातील रसिकांसाठी प्रसिद्ध रवी भाऊ अंजाळेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पारंपरिक कला आणि लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, झुले-पाळणे, खेळणी दुकाने तसेच संसारोपयोगी साहित्य विक्रेते दोन दिवस आधीच कळमसरेत दाखल झाले आहेत. यात्रेच्या निमित्ताने गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून, जुन्या परंपरा आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी नागरिक मोठ्या आनंदाने या जत्रेत सहभागी होत आहेत. गावगड्यातच खऱ्या अर्थाने जीवनाचा मनमुराद आनंद घेता येतो, अशी भावना गावकऱ्यांत दिसून येत आहे.

दरम्यान, यात्रोत्सव काळात भाविकांनी व नागरिकांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजक तसेच ग्रामपंचायत कळमसरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सहकार्याने यात्रा सुरक्षित व आनंदात पार पडावी, यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound