अमळनेर प्रतिनिधी । गावात सकाळी नळांना पाणी आल्याने इलेक्ट्रीक मोटार लावण्याची तयारी सुरु होती. मात्र, थोड्याच वेळात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोटारची पिन काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विजेच्या जोरदार धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील पाडळसरे येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील वैशाली संतोष कोळी (वय-34) असे मृत महिलेचे नाव असून आज (दि.५ ऑक्टोंबर) रोजी सकाळी साडे आठ वाजता ही घटना घडली. तिला ताबड़तोब अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तिचा मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शव विछेदन करून दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास तिच्यावर शोकाकुल वातावरणात गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.वैशाली हिला एक मुलगी ,एक मुलगा असून तिचे पती संतोष कोळी हा येथील पाडळसरे धरणावर इलेट्रीक कारागिर म्हणून कामाला आहे.तिच्या या अपघाती मृत्युने तिच्या मुलांचा व पतीचा आक्रोश मनाला हेलावनारा होता. या तरुण महिलेच्या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गावात पेटली नाही चूल
वैशाली हिच्या दुर्दैवी मृत्यूची वार्ता गावात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने स्मशान शांतता प्रस्थापित झाली होती. वैशाली हिचे पती संतोष कोळी व त्याच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्य हे मनमिळावू असल्याने रुग्णालयात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. शिवाय गावात चूलही पेटल्या नाहीत. तिच्या पच्यात पती, एक मुलगा एक मुलगी, सासु सासरे, दिर भावजयी असा परिवार आहे. मारवड पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.