मराठी तरूण आज अमेरिकनांना कोड्यात टाकणार !

mangesh ghogare

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था | महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेला आज एक भारतीय तरुण कोड्यात टाकणार आहे. अमेरिकेच्या एका सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात, आज गांधीजयंतीनिमित्त प्रसिद्ध होणारे शब्दकोडे तयार केले आहे मंगेश घोगरे या मराठी तरुणाने. असा मान मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.

 

त्याने तयार केलेले शब्दकोडे आज, गांधीजयंतीचं औचित्य साधून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या जगप्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून येणार आहे. त्याचं हे कोडं गांधीजींवर आधारित असणार आहे. त्यामुळे गांधीजयंतीच्या निमित्तानं भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे. नवी मुंबईचा रहिवासी असलेला मंगेश बँकिंग क्षेत्रात मोठ्या पदावर काम करतो. त्याला शब्दकोडी तयार करण्याचा छंद आहे. त्याची शब्दकोडी यापूर्वी जगप्रसिद्ध पेपरमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.

पनवेलमधील महात्मा एज्युकेशन सोसायटीत मंगेशचे शिक्षण झाले असून व्हीजेटीआय कॉलेजमधून इंजिनीअरिंग केल्यानंतर मंगेशने एमबीए केले आहे. सध्या तो एका मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये नोकरी करतो, मात्र नोकरीच्या धावपळीत त्याने शब्दकोड्यांच्या छंदाकडे दुर्लक्ष केले नाही. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनीही मंगेशने तयार केलेले कोडे प्रसिद्ध झाले होते. जगातल्या सर्वात जुन्या आणि बड्या दैनिकात शब्दकोडे प्रसिद्ध होणारा तो पहिला भारतीय असल्याचे या दैनिकाने म्हटले आहे.

Protected Content