मराठी साहित्य संस्कार संमेलनाचे मुखेडमध्ये १८ फेब्रुवारी रोजी आयोजन

मुखेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना व विविध उपक्रमांसह होणारे दुसरे मराठी साहित्य संस्कार संमेलन भरविण्याचा मान यंदा मुखेड शहरास मिळाला आहे. मराठी साहित्य संस्कार मंडळाची बैठक मुखेड येथे झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात वाचन, साहित्य संस्कार रुजावेत. यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, साहित्यिकांशी संवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

इसाप प्रकाशनद्वारा संचालित मराठी साहित्य संस्कार मंडळाचे संस्थापक व प्रकाशक दत्ता डांगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ग्रामीण जनतेस साहित्य संमेलन म्हणजे काय व ते कसे असते हे कळावे, शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखन, चित्रकला, कथाकथन स्पर्धा घेऊन, बक्षिसे देऊन त्यांच्यातील चित्रकार, लेखक घडवावा, तसेच वाङ्मयीन पुस्तके वाचण्यात विद्यार्थी व गावकरी यांचा उत्साह अधिक वाढावा यासाठी या संमेलनांचे आयोजन इसाप प्रकाशन करीत असते, असे दत्ता डांगे यांनी सांगितले.

मुखेडमध्ये होणारे हे संमेलन ‘साहित्यिकांच्या गावात साहित्य संमेलन’ या उपक्रमांतर्गत भरत आहे. नामवंत व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. निवृत्ती चांडोळकर यांचे येथे वास्तव्य आहे. तसेच त्यांची कर्मभूमीही मुखेडच आहे. तसेच येथे व परिसरात अनेक कवी, लेखक-लेखिका आहेत. या साहित्यिकांच्या या गावाचे दर्शन दूरवरून येणारे साहित्यिक, रसिक यांना घेता यावे, ग्रामसंस्कृती जवळून पाहता यावी आणि गावकऱ्यांना-विद्यार्थ्यांना साहित्यिकांशी संवाद साधता यावा या हेतुने हे संमेलन भरत आहे. साहित्य संमेलनात ‘सत्कार्याचा दीप’, ‘घरोघरी ग्रंथशिदोरी’ आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. या संमेलनास साहित्यिक व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन दत्ता डांगे यांनी केले आहे.

मुखेड शहर व तालुक्यातील कवी कवयित्रींनी या साहित्य संमेलनातील कविसंमेलनात सहभागी होण्यासाठी आपली नावे दत्ता डांगे (9890099541) किंवा एकनाथ डुमणे (9096714317) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. संमेलन आयोजनाच्या या बैठकीस प्रसिद्ध साहित्यिक प्रा. निवृत्ती चांडोळकर, शंकर वाडेवाले, एकनाथ डुमणे, पंडित पाटील, विजयकुमार चित्तरवाड, सौ. कुसुम चांडोळकर, संतोष तळेगावे, स्वप्नजा चांडोळकर, उपस्थित होते.

Protected Content