जळगाव राहूल शिरसाळे । जिल्ह्यातील अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असून आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा टोला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप नेत्यांना लगावला. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौर्याच्या नियोजनासाठी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील हे संवाद यात्रेच्या माध्यमातून दोन दिवसांच्या जिल्हा दौर्यावर येत आहेत. याच्या नियोजनासाठी आज जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराती, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार मनीष जैन, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, कल्पीता पाटील, सोपान पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी एकनाथराव खडसे म्हणाले की, जयंत पाटील यांच्या संवाद दौर्याच्या माध्यमातून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्याला चालना मिळणार आहे. ते प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जाणार असून स्थानिक पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीत अनेक जण येण्यासाठी इच्छुक असून या दौर्यात त्यांच्या प्रवेशाचे चांगले नियोजन करावे असे आवाहन खडसे यांनी केले. ते महाविकास आघाडी भरभक्कम असून हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर काही जणांच्या अहंकारामुळे भाजपला फटका बसल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
तर, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराती यांनी आपल्या भाषणातून संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
खालील व्हिडीओत पहा नाथाभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/847953252432462