अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपमधील बहुतांश नेते अस्वस्थ असून यातील अनेक जण हे आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
अकोला येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना नाना पटोले यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भाजपचं वर्चस्व, गर्वपणा, सत्तेची त्यांच्यामध्ये चढलेली नशा काही दिवसात उतरेल. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजेच दुसर्याचं घर तोडायचं आणि आपलं घर बनवायचं, हे जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा तोडायचे तेवढे तोडा, जनता त्यांना जागा दाखवेल. त्यांचे अनेक नेते आपल्या संपर्कात असून येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच असे नाना पटोले म्हणाले.
पटोले पुढे म्हणाले की, दरवर्षी होणार्या शिवाजी पार्कवर दसर्याच्या दिवशी मेळावा होत आहे. तो बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून होतोय. कॉंग्रेसच्या राजवट काळातही त्यांचा मेळावा भरायचा. त्यांनी ती परंपरा कायम ठेवलेली होती. त्या परंपरालाही कॉंग्रेस नेहमी त्यावेळी सहकार्य करायची. पण आता जे नवीन हिंदूहृदय सम्राट झालेले आहेत ते आता हिंदूच्या परंपरेला विरोध करताना पाहतोय. शिंदे यांचा एक सहकारी आमदार स्वतःच मुंबईत गणेश उत्सवामध्ये बंदूक चालविताना आपण पाहिलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. अशाप्रकारे कायदा सुव्यवस्था बिघवडण्याचा सरकारच प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी घातक व्यवस्था निर्माण झाली असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.