मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा हा सापळा असल्याचे लक्षात आल्याने रद्द करण्याचे जाहीर केल्यानंतर हा सापळा कुणी लावला आणि यासाठी कुणी रसद पोहचवली ? याची चर्चा सुरू झाली. यानंतर आज मनसे नेत्याने ट्विट करून यात पवारांचा सूचक उल्लेख केल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं सांगताना हा आरोप केला होता. यानंतर राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच आता मनसेकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून मनसेने अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप केला आहे.
मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. मावळमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेतील ही फोटो असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है असं म्हटलं आहे. यामुळे आता मनसेने थेट शरद पवार यांच्यावर आरोप केल्याचे दिसून येत आहे.