मनोज जरांगे यांच्या उपोषणास पुन्हा प्रारंभ

अंतरवाली सराटी-वृत्तसेवा | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून याआधी त्यांनी सरकारवर कडाडून टिका केली.

मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आपले उपोषण स्थगित केले होते. आता निकाल लागल्यानंतर त्यांनी नव्याने उपोषणाची घोषणा केली होती. या अनुषंगाने त्यांनी आज सकाळपासून नव्याने उपोषण सुरू केले आहे. आपले उपोषण सुरू करतांना पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या लढ्याची भूमिका विशद केली.

याप्रसंगी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात आता खासदारांची निवड पूर्ण झाली असून या सर्वांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावे अशी आपली अपेक्षा आहे. मी स्वत: राजकारणात जाणार नाही. तथापि, आरक्षण न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागांवरून उमेदवार उभे करणार, आणि आरक्षणाच्या विरोधकांना अगदी ठरवून पाडणार असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, आपण उपोषण सुरू केले असले तरी समाजबांधवांनी पहिल्यांदा शेतीची कामे आटोपून घ्यावीत. कुणीही अंतरवाली सराटी येथे येण्याची घाई करू नये असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले आहे.

Protected Content