संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि वर्तमान घडलेल्या घटनांवर आधारित संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील येत्या जुन महिन्यात २१ तारखेला प्रदर्शित होणार असून याच्या प्रदर्शनाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

सकल मराठा समाज खामगाव च्या वतीने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील चित्रपटाच्या टीमचे दि. २२ मे बुधवार रोजी शहरातील तुळजाई हॉल मध्ये दुपारच्या सुमारास पत्रकार परिषद तसेच सकल मराठा समाज बांधवांशी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमला शहरातील सकल मराठा समाज बांधव तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, हा माझा पहिलाच बायोपिक आहे. याआधी मी मुसंडी, मजनू खळगं असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणे हे जरा सोपे असते. कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो. परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट हे तेवढेच कठीण असते. त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठे चॅलेंज होते. ज्यांच्या आंदोलनाची दखल राज्यासह देश आणि संपूर्ण जगाने घेतली असे संघर्ष बोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर लवकरच बघायला मिळणार आहे.

आंतरवाली सराटी येथे उपोषणादरम्यान सरकारने लाठीचार्ज केला आणि त्यानंतर मनोज जरांगे हे नाव सर्वांच्या कानीकपाळी गेले. मात्र त्यांचा प्रवाह हा अनेक खाच खळग्यांनी भरलेला आहे. राज्याच राजकारणं कधी नव्हे असे धगधगत असतांना या अस्थिर वातावरणामध्ये जरांगे यांची गाजलेली आंदोलने, त्यांची आमिषाला बळी न पडणारी रोखठोख भूमिका, अनेक नेत्यांचा विरोध या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकषनि पुढे येत आहे. वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली हे मी नक्कीच नमूद करू इच्छितो. आणि त्यामुळेच हे मी शिवधनुष्य पेलू शकलो असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ’संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या २१ जुन ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे.

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजातील हृदयाला भिडणार्या ’उधळीन जीव… ’या गीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Protected Content