काहीही झाले तरी मंगेश चव्हाण विधानसभा लढवणारच !

mangesh chavan

चाळीसगाव दिलीप घोरपडे । युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी सध्या मतदारसंघात सुरू केलेले संपर्क अभियान आणि याला मिळत असणारा प्रतिसाद पाहता ते काहीही झाले तरी विधानसभा लढवणारच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील यांची दणदणीत मताधिक्याने खासदारपदी निवड झाल्यानंतर पुढील आमदार कोण ? हाच एकमेव प्रश्‍न विचारला जात आहे. सध्या मतदारसंघात असंख्य भावी आमदार वावरत आहेत. प्रत्येकाने ज्याच्या-त्याच्या परीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. बहुतांश इच्छुक भाजपकडून तिकिट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना, अन्य पक्ष आणि अपक्ष या क्रमाने उमेदवार इच्छुक आहेत. यात सद्यस्थितीचा विचार करता, भाजपतर्फे युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांची जोरदार तयारीसह मतदारसंघात संपर्क अभियान सुरू केले आहे. याला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचे नियोजन पाहता चव्हाण हे विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर मतदारसंघात आधीच ”दिल्लीत उन्मेष तर मुंबईत मंगेश” ही चर्चा आधीच सुरू झालेली आहे.

खासदार उन्मेषदादा पाटील व मंगेश चव्हाण यांची मैत्री सर्वांना माहित आहे. दोन्ही तरूणांनी सर्वसामान्य परिस्थितीतून आजवर मारलेली मजल ही आश्‍चर्यकारक अशीच आहे. यात उन्मेष पाटील यांनी परिश्रमपूर्वक आमदारकी आणि यानंतर खासदारकी संपादन केली असून ते राजकीय मार्गावर गतीमान आगेकूच करत आहेत. यामुळे आता चाळीसगाव तालुक्यातून त्यांचे जिवश्‍च-कंठश्‍च मित्र मंगेश चव्हाण हे उमेदवार असतील असे मानले जात आहे. या अनुषंगाने मंगेश चव्हाण यांनी कधीपासूनच तयारीदेखील सुरू केली आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसाला शहरवासियांसाठी सीसीटिव्हीची भेट देऊन याला प्रारंभ केला. यानंतर त्यांनी विविध माध्यमातून समाजसेवा केली असून याला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. यात भयंकर दुष्काळात जनावरांसाठी चारा छावणी सुरू करून त्यांनी पशुधनाला जीवदान दिले. दुष्काळ निवारणासाठी तालुक्यात ठिकठिकाणी नाला खोलीकरण, नदी रूंदीकरण आदी कामांना त्यांनी मदत केली असून याचे दृश्य परिणाम आता जाणवू लागले आहेत. त्यांनी तालुक्यातील भाविकांना पंढरी वारी घडवली असून यानंतर नाणीज वारीचे दर्शनदेखील घडविले आहे. लवकरच ते मतदारसंघातील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र शीत शवपेटी देणार असून याची ऑर्डरदेखील देण्यात आली आहे. तर मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे त्यांची विधानसभेची तयारी सुरू असल्याची बाब स्पष्ट आहे.

मध्यंतरी काही घटनांच्या माध्यमातून मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, प्रस्तुत प्रतिनिधीने मंगेश चव्हाण यांना याबाबत विचारले असता त्यांनी काहीही झाले तरी आपण विधानसभेच्या रिंगणात उतरून उन्मेषदादांच्या मदतीने विजय संपादन करणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे चाळीसगावच्या राजकीय रिंगणात मंगेशदादा असतील यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

Protected Content