जळगाव (प्रतिनिधी) घनदाट जंगलात, पर्वतांवर, नद्यांच्या किनाऱ्यावर हिंस्त्र प्राण्यांच्या आजूबाजूला अविश्वसनीय अॅडव्हेंचरसाठी ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ आणि या कार्यक्रमाचा सूत्रधार बेअर ग्रिल्स जगप्रसिद्ध आहे. आता बेअर ग्रिल्स यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील खड्डे आणि इतर समस्यांसोबत ‘मॅन व्हर्सेस जळगाव’ ही ‘टॅग लाईन’ घेऊन तयार करण्यात आलेल्या विविध मिमची जळगावच्या सोशल मीडियात धूम सुरु आहे. दरम्यान, यानिमित्ताने जळगावकरांनी महापालिकेच्या कामाचे वाभाडे काढलेले आहेत.
आज सकाळपासून’मॅन व्हर्सेस वाईल्ड’ आणि या कार्यक्रमाचा सूत्रधार बेअर ग्रिल्सचे विविध मिम व्हायरल होत आहेत. या मिममध्ये जळगाव शहरातील विविध समस्या आणि त्यासोबत बेअर ग्रिल्सचे वेगवेगळी फोटो लावण्यात आली आहे. या मिममध्ये जळगाव महापालिका आणि डिस्को-व्हेरी प्रेझेंट ‘मॅन व्हर्सेस जळगाव’ असा उपहासात्मक उल्लेख आहे. या मिमची सुरुवात शहरातील प्रसिद्ध डीजे शिवा सिस्टिमचे संचालक किशोर पाटील व त्यांच्या पत्नी संध्या पाटील यांनी केली. बघता-बघता हे मिम मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या मिममध्ये प्रेम नगर बोगद्याच्या पाण्यातून बेअर ग्रिल्स वाट काढतोय. काव्य रत्नावली चौक ते गिरणा टाकी दरम्यान असलेल्या चिखलात बेअर ग्रिल्स अडकल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मिमवर मोठ्या गंमतीशीर प्रतिक्रियांचा पाऊस सुरु आहे. दरम्यान, बेअर ग्रिल्स यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ शोचा एपिसोड 12 ऑगस्टला रात्री 9 वाजता डिस्कवरी चॅनलवर दाखविण्यात येणार आहे.