कोलकाता । पश्चीम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर आज पुन्हा एक हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. राज्य सरकारचे दोन मंत्री व एका आमदाराला सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ममतांनी आक्रमक होत सीबीआयला आव्हान दिल्याने तणाव निर्माण झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दोन मंत्र्यांना आणि एका आमदाराला नारडा घोटाळ्यात सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली. या नंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेले आहे. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या.
मंत्री, आमदारांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे कळताच सीबीआय कार्यालयाबाहेर तृणणूलच्या कार्यकर्त्यांनी जमाव करत आंदोलन करण्यास सुरुवात केली. यानंतर काही वेळाने कार्यकर्त्यांनी सीबीआय ऑफिसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला आहे. तर, या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्यात चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात आणण्यात आले आहे, या चारही नेत्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र, त्यांना अटक केली नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.